पुणे : स्वारगेट बसस्टँड परिसरात लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून बेड्या ठोकण्यात आल्या. दत्तात्रय गाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर गाडेला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला.
न्यायालयाने आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. आरोपीचे वकील म्हणाले, या घटनेनंतर बसमधून दोघे व्यवस्थित बाहेर आले. नंतर आरोपी निघून गेला तर मुलगी दुसऱ्या बसच्या दिशेने गेली. हे सिसिटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. तर सखोल चौकशीसाठी कोठडी मागितल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले आहे
आरोपी दत्तात्रय गाडे याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते. तसेच गावकऱ्यांनी त्याला गावात पहिल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी गुनाट या गावातच त्याचा शोध घेण्याची ठरवले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. आणि गुनाट गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू झाला. ड्रोनच्या माध्यमातून उसाच्या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र सायंकाळपर्यंत तो सापडून आला नव्हता. अखेर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला.
बलात्कार केल्यानंतर आरोपी गाडे थेट जन्मगाव असलेल्या शिरूर तालुक्यातील गुणाट गाव परिसरात गेल्याची माहिती समोर आली होती. इतकच नाही तर आरोपी याच परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची ही शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत होती. त्या दृष्टीने पोलिसांनी श्वान पथक बोलावून त्या मार्फत आरोपीचा शोध घेतला जात होता अखेर शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या हाताला लागला.
असा झाला युक्तिवाद
आरोपीला सांयंकाळी ६.३० वाजता हजर करण्यात आले. सदरचा गुन्हा गंभीर असल्याने समाजात तीव्र पडसाद असून १५ दिवस पोलीस कोठडी मिळणे आवश्यक आहे. तसेच गळा दाबून अत्याचार केला. असा युक्तीवाद पोलीस कोठडी मागताना पोलिसांनी केला. यावेळी आरोपीचे कपडे, मोबाईल, जप्त करणे तसेच वैद्यकीय तपास यासाठी तसेच आरोपींवर इतर गुन्हे आहेत. गुन्ह्यात इतर साथीदार होते का? फरार असताना आसऱ्यासाठी कोणी सहकार्य केले का? यासाठी कोठडी आवश्यक आहे. तसेच सराईत गुन्हेगार गंभीर ६ गुन्हे आहेत पैकी ४ गुन्ह्यांत महिला फिर्यादी आहेत. असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. तसेच तोंड दाबल्याने आवाज केला नाही असा युक्तिवाद केला.
सीसीटीव्ही व महिलेचे कपडे जप्त करण्यात आले आहेत. यावेळी आरोपीचे वकिलांनी पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे सांगत, सीसीटीव्हीत मुलगी स्वतःहून बसमध्ये चढली व त्यापाठीमागे आरोपी चढला असे सांगत घटनेवर प्रश्वचिव्ह निर्माण केले. तसेच सहमतीने संबंध झाल्याचे सांगितले. आरोपीचा टीव्हीवर चेहरा दाखवल्याने टी /आय पीरेड चा प्रश्न राहत नाही. आरोपीवर असलेले गुन्हे सिद्ध नाहीत. त्यामुळे सराईत म्हणता येणार नाही. त्यामुळे २ दिवसांची कोठडी पुरेशी असताना १४ दिवस कोठडीची आवश्यकता नाही. असा युक्तीवाद करत आरोपीच्या वकिलांनी विरोध केला. अखेर कोर्टाने १२ दिवस पोलीस कोठडीचा निर्णय दिला. पुढील सुनावणी १२ मार्च रोजी होणार आहे.