Datta Gade Police Custody till 12 March: स्वारगेट बसस्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला मध्यरात्री अटक करण्यात आली. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर आज त्याला कोर्टात हजर केले असता, त्याला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी दत्तात्रय गाडे याचा युद्धपातळीवर शोध सुरू होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुनाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते. तसेच गावकऱ्यांनी त्याला गावात पहिल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी गुनाट या गावातच त्याचा शोध घेण्याची ठरवले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. आणि गुनाट गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू झाला. ड्रोनच्या माध्यमातून उसाच्या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र सायंकाळपर्यंत तो सापडला नव्हता. अखेर काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला. त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
घडलेला प्रकार परस्पर सहमतीने- आरोपीचे वकिल
स्वारगेट बसस्टँडवरील प्रकार हा परस्पर सहमतीने घडल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. आजच्या न्यायालयीन सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी असे सांगितले की, आरोपी आणि ती तरुणी यांच्या जे घडले ते परस्पर सहमतीने घडले. त्यामुळे या लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार म्हणता येणार नाही. आरोपीच्या वकिलांनी आरोपीची बाजू कोर्टात मांडली असली तरीही दत्ता गाडेचा मोबाईल मिसिंग आहे, तसेच त्याच्यासोबत कुणी आणखी माणसं होती का? अशा विविध गोष्टींची चौकशी करण्यासाठी दत्ता गाडेला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे वकिलांनी सांगितले.