पुणे : स्वारगेट परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत आले असून, फेबुवारीअखेर तो वाहतुकीस खुला केला जाईल, अशी माहिती रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली़ सध्या या पुलाचा एक भाग वाहतुकीला खुला करण्यात आला असून, पुलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे़ जेधे चौकातून हडपसरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या दोन भागांचे काम प्रगतिपथावर आहे़ सध्या सेंटरिंगचे काम सुरू असून, शंकरशेठ रोडवरून सारसबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर भुयारी मार्ग बांधण्याचे काम सुरू होईल़ ते काम आॅगस्टपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे़ सातारा रस्त्यावरील मोठा उड्डाण- पूल साई मंदिर चौक, पंचमी हॉटेल येथे सुरू होत असून, व्होल्गा चौक, जेधे चौक ओलांडून एक बाजू सारसबागेकडे, तर दुसरी बाजू हडपसरकडे जाते़ या दोन्ही उड्डाणपुलांच्या मधून बीआरटीसाठी मार्ग सोडण्यात आलेला आहे़ शंकरशेठ रोडवरून येणारी वाहने सारसबागेकडे जाण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर करतील़ हा भुयारी मार्ग आयकर विभाग कार्यालय ते नेहरू स्टेडियमपर्यंत असेल़ सर्व कामे पूर्ण होऊन पुलाचा वापर वाहतुकीस सुरू झाल्यावर, ९० टक्के वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे़ भविष्यात मेट्रो मार्गासाठी या पुलाचा कोणताही अडथळा येणार नसल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले़
स्वारगेट उड्डाणपूल पूर्णत्वाकडे
By admin | Published: January 08, 2016 1:47 AM