पुणे : स्वारगेट ते कात्रज चौकापर्यंत गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या बीआरटी मागार्तील बहुतांशी त्रुटी दूर झाल्या असून, उरलेल्या बाबी येत्या तीन दिवसांत पूर्ण करणार आहोत. त्यामुळे स्वारगेट-कात्रज हा बीआरटी मार्ग येत्या १ जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या बीआरटी मार्गाची पाहणी महापौर मोहोळ यांनी सोमवारी केली़ यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर सरस्वती शेंडगे, आयुक्त विक्रम कुमार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीकर, प्रवीण चोरबेले, गोपाळ चिंतल, महेश वाबळे, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, वाहतूक उपयुक्त राहुल श्रीरामे, पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, विद्युतचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते़
कामाच्या पाहणीनंतर महापौरांनी बीआरटी सुरु करण्याची घोषणा केली. ते म्हणाले, स्वारगेट-कात्रज बीआरटीच्या कामाची निविदा २०१६ साली काढण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणी आल्याने २०१८ साली नव्याने ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यातच आचारसंहिता आणि या रस्त्यावररील प्रमुख दोन उड्डाणपुलांची कामे यामुळे बीआरटीच्या कामाला विलंब झाला. आता यातील बहुतांश त्रुटी दूर झाल्या असून उरलेली काही कामे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येत आहेत. त्यामुळे हा मार्ग खुला करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
--------------------------
फोटो मेल केले आहेत़