पुणे : महापालिकेच्या मुख्य सभेने दीड-दोन वर्षांपूर्वी मान्यता आराखडा दिलेल्या स्वारगेट ते कात्रज मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचा आराखडा अद्यापही अंतिम करण्यात आलेला नसल्याचे चित्र आहे. राजकीय एकमताअभावी हा आराखडा अधांतरीच लटकल्याचे बोलले जात आहे.निगडी ते स्वारगेट मेट्रो पुढे कात्रजपर्यंत वाढविण्यास मुख्य सभेने ठराव मंजूर केला होता. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम महामेट्रोला देण्यात आले आहे. महामेट्रोने या मार्गाची पाहणी केली होती. त्याचा प्रकल्प आराखडाही तयार करण्यात आला. मात्र, महामेट्रोने सुचविलेला मार्ग व्यवहार्य नसल्याचे मत काही राजकीय पक्षांकडून मांडण्यात आल्याने हा आराखडा अंतिम स्वरूप गाठू शकला नाही.या मार्गावर उन्नत आणि भुयारी अशी दोन्ही स्वरूपाची मेट्रो होऊ शकते, अशी भौगोलिक स्थिती आहे. त्यादृष्टीने सर्वेक्षण सुरू असून नागरिकांना परवडणारी मेट्रो झाली पाहिजे, अधिक खर्च झाल्यास व्यवहार्य ठरणार नाही. त्यामुळे सर्वंकष अभ्यासाअंती अंतिम अहवाल सादर केला जाणार असल्याचे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. मार्गाला सर्वच राजकीय पक्षांचा विरोधमहामेट्रोने मुकुंदनगर, मार्केट यार्ड, अप्पर इंदिरानगर असा मार्ग सुचविला होता. या मार्गाला जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला. वास्तविक स्वारगेट ते कात्रज असा सरळ मेट्रो मार्ग असणे आवश्यक असताना अन्य मार्गाने मेट्रोमार्ग प्रस्तावित करू नये, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉँग्रेसने घेतली होती.
स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा आराखडाच अद्याप अधांतरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 3:24 AM