खंडाळा (सातारा) : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील पारगाव हद्दीत स्वारगेट ते कोल्हापूर जाणा-या एसटी बसच्या चालकास गाडी चालवत असतानाच हृदयविकाराचा झटका आला. यामुळे झालेल्या अपघातात दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. एका प्रवाशाच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
राष्ट्रीय महामार्गावरून निघालेली कोल्हापूर आगाराची बस (एमएच १४ बीटी ४७८५) ही खंडाळा तालुक्यातील पारगाव गावच्या हद्दीत आली असता चालक भारत तुळशीदास होवाळ (रा. हातकणंगले) यांना झटका आला. त्यामुळे त्यांचा एसटीवरील ताबा सुटला. समोरील गॅसच्या टँकरला एसटी घासताच शेजारी बसलेल्या रमेश वाळके या प्रवाशाने उठून गाडीचा ब्रेक दाबला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गाडीतील किरकोळ जखमी दोन प्रवासी वगळता ५५ जण सुखरूप राहिले. या अपघातात विलास सूर्यवंशी व मालू वाळके दोघे जखमी झाले.
याच मार्गावर आज सकाळी उंब्रज येथील भराव पुलावर शुक्रवारी (5 जानेवारी ) सकाळी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला. या अपघातावेळी ट्रॅव्हल्सनं दोन महिला व तीन महाविद्यालयीन तरुणांना उडवलं. या अपघातात ट्रॅव्हल्स चालकासह एक महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून कोल्हापूर दिशेने भरधाव येणा-या ट्रॅव्हल्सच्या (एम-एच-०३ सी पी १४७३) चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यावेळी उंब्रज बस स्थानकासमोर महामार्गावर कराडकडे जाण्यासाठी थांबलेल्या 5 जणांना ट्रॅव्हल्सने उडवले. या भीषण अपघातात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जखमी झाले.
यानंतर ट्रॅव्हल्स 100 मीटर अंतरावर जाऊन दुभाजकाला जाऊन धडकली. यात चालकाचाही मृत्यू झाला. चालकाचा मृत्यू अपघातामुळे झाला की हृदयविकाराच्या झटक्यानं, याची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, अपघात झाला त्यावेळी ट्रॅव्हल्समध्ये सुमारे 25 ते 30 प्रवासी होते. सुदैवानं सर्वजण सुखरुप आहेत.