पुणे : स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बसस्थानकाबाहेर अनधिकृतरीत्या थांबणाऱ्या खासगी वाहनांवर आरटीओच्या वायुवेग पथकाने कारवाई केली. वाहनांचा इन्शुरन्स, लायसन्स, नो युनिफॉर्म आदींबाबत तपासणी करून दोषी आढळलेल्या एकूण ६६ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यातील १४ वाहने अटकावून ठेवण्यात आली असून, ३ लाख १५ रुपये दंड आकारण्यात आला आहे.
स्वारगेट आगारातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर आगारातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तसेच आगाराच्या बाहेर थांबणारी खासगी वाहने, प्रवासी मिळविण्यासाठी त्यांच्याकडून स्टॅण्डमध्ये होणारी घुसखोरी आदींबाबत चर्चा सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सलग दोन दिवस शहरातील प्रमुख स्थानकांबाहेर कारवाई केली. विशेषतः आगाराच्या दोनशे मीटर परिसरात नो पार्किंग झोनमध्ये थांबलेली खासगी वाहने, इतर नियमभंग करणाऱ्या वाहनांवर या पथकाने कारवाई केली. यामध्ये लायसन्स, इन्शुरन्स, परमिट संपलेली वाहने आदींचा समावेश आहे. मोटार वाहन निरीक्षक नीलेश बनसोडे, सहायक मोटार वाहन निरीक्षक भाग्यश्री पाटील, कांचन आवारे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
बसस्थानकाबाहेर थांबणाऱ्या खासगी वाहनांची तपासणी करण्यात आली असून, नियमभंग करणाऱ्या जवळपास ६६ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यापुढे देखील अशा वाहनांवर कारवाई केली जाईल. - स्वप्निल भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.