पुणे : बाणेर येथील स्वर्णव सतीश चव्हाण (वय ४) या मुलाला अपहरणकर्त्याने तब्बल ८ दिवसांनंतर सोडून दिले. स्वर्णव हा आपल्या घरी परतल्यानंतर या अपहरणकर्त्याचा गेल्या २४ तासांत तपास लागू शकला नाही. पुणे पोलिसांनी (pune police) चिखली, पिंपरी चिंचवड परिसरात आज अनेक ठिकाणी छापे घालून आरोपीचा शोध घेतला. (swarnav chavan kidnapping case pune)
स्वर्णव याचे अपहरण कशासाठी केले यामागील कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. अपहरणकर्त्याने त्याला सोडण्यासाठी खंडणी मागितली नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्याचबरोबर या अपहरणकर्त्याने आपण सीसीटीव्हीमध्ये दिसणार नाही, याची काळजी घेतलेली दिसून येते. डुग्गू याला ज्या ठिकाणी सोडले, त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी करण्यात आली. मात्र, त्याचवेळी येथील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे लक्षात आले. या परिसरात पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण करून काही पुरावे मिळविण्याचा प्रयत्न केला.
रस्त्यावरील बंद असलेले कॅमेरे हे अपहरणकर्त्याच्या पथ्यावरच पडले. नऊ दिवस चारशेपेक्षा अधिक पोलिसांनी तपास केला. तब्बल पाचशेपेक्षा अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. २० ते २५ ठिकाणी अपहरणकर्ता कॅमेऱ्यात कैद देखील झाला. मात्र, ते अतिशय अस्पष्ट असल्याने त्यावरून ओळख पटविणे अवघड झाले आहे.
अपहरणकर्त्याने डुग्गूला पळवून नेताना काळे जॅकेट, डोक्याला हेल्मेट व पाठीला सॅक अडकवली होती. डुग्गूला बुधवारी सोडवतानाही त्याने काळे जॅकेट घातले होते. संपूर्ण चेहरा झाकला होता. सोडताना तो डुग्गूला चालत घेऊन आला होता. जातानाही चालत गेला होता. डुग्गू सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सर्व परिसरातील नाकाबंदी केली. गुरुवारी दिवसभर पोलिसांची पथके पुनावळे परिसरात तळ ठोकून होती.
अपहरणकर्ता परिचित असण्याची शक्यता-
अपहरणकर्त्याने डुग्गू त्याच्या पालकांपर्यंत पोहोचावा, पण आपल्याला ओळखू नये अशा व्यक्तीची निवड केलेली दिसते. तो सोडून गेल्यानंतरच डुग्गू रडू लागला यावरून तो परिचित असावा, असे दिसून येते. डुग्गू सापडल्यानंतरही पोलिसांनी अगोदर ज्या प्रकारे तपास केला जात होता, त्याच पद्धतीने अजून तपास सुरू असून आम्ही लवकरच अपहरणकर्त्यापर्यंत पोहोचू, असे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.