पुणे : दिलरूबा मधुर हा, नच उरत सुखमाधुरी, येतील कधी यदुवीर, प्रिये पहा अशा छोटा गंधर्वांच्या अप्रचलित नाटयपदांच्या सादरीकरणाने रसिकांची सायंकाळ ‘स्वरमयी’ झाली. निमित्त होते, भरत नाट्य मंदिर येथे रंगलेल्या ‘स्वरराज गान’ कार्यक्रमाचे. सांस्कृतिक कला अकादमी पुणे या संस्थेतर्फे कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. नाटयसंगीत’ हा श्रोत्यांचा अत्यंत आवडता असा पैलू. छोटा गंधर्वांच्या सांगीतिक कारकिर्दीला उजाळा देणे आणि त्यांच्या विविध शैलीतील संगीताचा सुखद पुन:प्रत्यय श्रोत्यांना देणे हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून अतिशय रंजक पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. ‘सौभद्र’ नाटकातील ‘तुम्हा तो शंकर सुखकर हो’ या नांदीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. मुकुंदराज गोडबोले, राजश्री ओक, धनश्री कुलकर्णी, ॠषिकेश बोडस या गायकांनी छोटा गंधर्वांच्या नाट्यपदांचा सुरेल नजराणा रसिकांसमोर पेश केला. काळाच्या पडद्यावर गेलेली काहीशी अप्रसिध्द पण दर्जेदार अशी ‘प्राणप्रतिष्ठा’, ‘दिल्लीहून सुटका’ आणि ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील पदांची झलक सादर करण्यात आली. अध्यात्मिक मार्गाचे पथिक असलेल्या छोट्या गंधर्वांची लोकप्रिय भक्तीगीतांनीही वातावरणात भक्तीरस जागृत केला. ‘वागधीश्वरी’या एका अनवट रागातील छोटा गंधर्व रचित बंदिश छोटा गंधर्व यांच्या ज्येष्ठ शिष्या माधुरी ओक यांनी गायली. विश्वनाथ ओक ( हार्मोनिअम), अमित ओक (इलेक्ट्रॉनिक आॅर्गन), माधव मोडक व नरेंद्र साठे ( तबला) यांनी साथसंगत केली. संगीतकार विश्वनाथ ओक यांची संहिता आणि तिचे सादरीकरण ही कार्यक्रमाची अत्यंत जमेची बाजू ठरली.
छोटा गंधर्वांनी अजरामर केलेल्या गीतांचे ‘स्वरराज गान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 6:14 PM
या कार्यक्रमात काळाच्या पडद्यावर गेलेली काहीशी अप्रसिध्द पण दर्जेदार अशी ‘प्राणप्रतिष्ठा’, ‘दिल्लीहून सुटका’ आणि ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील पदांची झलक सादर करण्यात आली.
ठळक मुद्दे‘सौभद्र’ नाटकातील ‘तुम्हा तो शंकर सुखकर हो’ या नांदीने कार्यक्रमाची सुरूवात