पुणे : महिलांचे आत्मभान जागृत करणे, त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदत उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबी करणे, या हेतूने कौटुंबिक न्यायालय या ठिकाणी सुरू करण्यात आलेला ‘स्वयंसिद्धा’ हा उपक्रम आता संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याकरिता रोटरी क्लब आॅफ गांधी भवन आणि रोटरी क्लब आॅफ मेट्रो यांच्या वतीने गुरुवारी (दि. २६ )आॅनलाइन राज्यस्तरीय बैठक पुणे कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
पुणे कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश मनीषा काळे, जळगाव कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश रितेश लिमकर उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध कौटुंबिक न्यायालयांतील समुपदेशक आणि ५२ प्रतिनिधी सहभागी झाले होते. विवाह समुपदेशक डॉ. स्मिता जोशी यांच्या प्रयत्नातून जळगाव कौटुंबिक न्यायालयातून १६ स्वयंसिद्धा सहभागी झाल्या होत्या. स्वयंसिद्धा उपक्रमाबाबत आणि या उपक्रमातून घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाबाबतची माहिती या कार्यक्रमातून देण्यात आली. विधिज्ञा वैशाली भागवत, रोटरी क्लब आॅफ गांधी भवनचे माजी अध्यक्ष प्रवीण बर्वे, प्रकल्प समन्वयक श्यामल मराठे, रोटरी क्लब आॅफ मेट्रोच्या पद्मा शहाणे आणि प्रकल्प समन्वयक शोभना परांजपे यांनी ‘स्वयंसिद्धा’ या उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली.
या वेळी यशस्वी स्वयंसिद्धा नीलम शिंदे हिने तिचा खडतर प्रवास आणि स्वयंसिद्धा उपक्रमात सहभागी झाल्यामुळे तिला मिळालेले आत्मभान याबाबत मनोगत व्यक्त केले.
महिलांचे आत्मभान जागृत करण्यासाठी स्वयंसिद्धा हा उपक्रम सर्व कौटुंबिक न्यायालयांत राबविला जावा, याबाबत प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी मार्गदर्शन केले. विवाह समुपदेशक डॉ. सुरेश सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि विवाह समुपदेशक राणी दाते यांनी आभार मानले.
-------------------------