तुषार सोनवणे
पुणे : भूक लागून त्या मुलींच्या पोटाच्या खळगीत आगडोंब उसळत असला, तरी तो विझविण्यासाठी अन्नाचा घास भरविणारी माय रुग्णालयात आपल्या लेकीच्या काळजीपोटी रोज मरत आहे. इकडे घरी मात्र त्या आईच्या लेकी अन्नासाठी व्याकुळ होऊन दाताचे पाणी गिळून गप्प बसल्या आहेत. अपंग असलेला बापही त्यांना कमावून काही देऊ शकत नसल्याने त्याच्या वेदनाही पिळवटून टाकत आहेत. ही व्यथा श्वेता कांबळे या रुबेला लसीकरणानंतर अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलीच्या घरातील आहे. रुबेला लसीकरण केल्यामुळे श्वेता कांबळे हिला विषाणूजन्य आजाराचा संसर्ग होऊन तिला अतिदक्षता विभागात दाखल केले. तिच्या देखरेखीसाठी आई रुग्णालयात थांबत असल्याने घरची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. कारण श्वेताचे वडील अपंग असल्याने नाईलाजाने घरीच बसून आहेत. तसेच घरी तीन मुलीदेखील आहेत. त्यामुळे एकटी कमावती आई रुग्णालयात असल्याने या कुटुंबाचे जगणे कठीण बनले आहे. आता जगायचं कसं? असा प्रश्न या कुटुंबीयांसमोर ‘आ’वासून उभा आहे. श्वेतावर १५ दिवसांपासून उपचार सुरू असून, तिच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. श्वेताचे वडील संतोष कांबळे अपंग असल्याने त्यांना बाहेर जाऊन काही करता येत नाही. त्यामुळे घरात एक वेळ जेवणाची भ्रांत लागून राहिली आहे. मुलीला पाहायला जाण्यासाठीदेखील संतोष कांबळे यांच्याकडे पैसे नाहीत. संतोष कांबळे दोन वर्षांपूर्वी पेंटिंगचे काम करीत असताना बोरीवरून पडल्याने त्यांचा अपघात झाला. त्यात त्यांना अपंगत्व आले. त्यामुळे ते घरीच बसून आहेत. दरम्यान, श्वेताला नळीवाटे रोज २०० मिली दूध आणि किवी फळाचा ज्युस देण्यात येत आहे.ससूनमध्ये अतिदक्षता विभागात श्वेतावर उपचारश्वेताची आई धुण्या-भांड्याचे काम करून आपल्या संसाराचा गाडा चालवतात. परंतु श्वेताच्या उपचारामुळे सध्या त्यासुद्धा पूर्णवेळ ससूनमध्येच असतात. संतोष कांबळे यांचे नातेवाईक गावाकडे राहतात. तिथेही आधीच दुष्काळ पडल्याने त्यांनाही मदत करणे शक्य होत नाही. ससूनमधील बालरोग विभागातील अतिदक्षता विभागातील वॉर्डात श्वेताला ठेवले आहे.काम करायची इच्छा आहे, पण...४संतोष कांबळे म्हणाले, ‘‘श्वेता आणि तिची आई रुग्णालयात आहे. त्यामुळे घरात राशन आणणारे कोणी नाही. कारण आमच्याकडे पैसेच नाहीत. मुली जेवण करतात की नाही ते पण कळत नाही. त्यांना विचारले तर त्या जेवलो बाबा असे सांगतात. शेजारी-पाजारी जेवण आणून देत आहेत. परंतु, ते तरी किती दिवस जेवण पुरविणार आहेत. मला काम करायची इच्छा आहे, पण अपंग असल्याने कोण काम देणार, हा प्रश्न आहे.’’