मुंबई, दि. 12 - खालापूर टोल नाक्यावर कार्ड स्वाईप करणं पुण्यातील सेल्स मॅनेजरला भलतंच महाग पडलं आहे. टोल नाक्यावर कार्ड स्वाईप केल्याने दर्शन पाटील यांना 87 हजारांचा फटका बसला आहे. टोल नाक्यावर 230 रुपयांचा टोल भरण्यासाठी कार्ड स्वाईप केल्यानंतर पुढील दोन तासात त्यांच्या खात्यातून 87 हजार रुपये डेबिट झाले आहेत. आपल्या कष्टाचे पैसे अशाप्रकारे चोरी झाल्याने दर्शन पाटील यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार दर्शन पाटील शनिवारी आपल्या घरी पुण्याला चालले असताना हा प्रकार घडला आहे. यावेळी खालापूर टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी थांबले असताना हा प्रकार घडला आहे.
'संध्याकळी 6 वाजून 27 मिनिटांनी मी खालापूर टोल नाक्यावर 230 रुपयांचा टोल भरला. यानंतर मला लगेच पैसे डेबिट झाल्याचाही मेसेज आला. पण रात्री 8 वाजून 31 मिनिटांनी मला माझ्या कार्डवरुन 20 हजार रुपयांची खरेदी केल्याचा मेसेज आला. यानंतर काही मिनिटातच मला डेबिट कार्डवरुन खरेदी केल्याची सहा मेसेज आले', अशी माहिती दर्शन पाटील यांनी दिली आहे.
फक्त चार मिनिटांत गेले 87 हजार रुपये8 वाजून 34 मिनिटे झाली असताना दर्शन पाटील यांच्या खात्यातून 87 हजार रुपये गायब झाले होते. पण यानंतरही चोरांचं पोट भरलं नव्हतं. त्यांनी यानंतर एकदा 100 रुपयांचं तर तीनदा 10 रुपयांचा व्यवहार केला.
'सायबर क्रिमिनल्सने माझ्या खात्यावरुन व्यवहार करत कष्टाचे पैसे पळवले आहेत. त्यांनी एक रुपयाही मागे ठेवलेला नाही', असं दर्शन पाटील बोलले आहेत.
टोलनाक्यावर आपलं कार्ड स्वाईप केलं असता महत्वाची माहिती चोरी झाल्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही असं दर्शन पाटील यांनी सांगितलं आहे. 'मी माझा पिन क्रमांक कोणालाच देत नाही. पिन कोडदेखील मी स्वत: टाकला होता. मात्र तेथील लोकांनी हातचालाखी केली असल्याचा दावा नाकारता येत नाही. टोलनाक्याची खिडकी उंचावर होती, तसंच डोक्यावर सीसीटीव्ही कॅमेराही होती', अशी माहिती दर्शन पाटील यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे दर्शन पाटील यांच्या डेबिट कार्डवरुन चोरांनी व्यवहार केला असताना त्यांना एकदाही ओटीपी क्रमांकासाठी मेसेज आला नाही. दर्शन पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांनी बँकेकडे लेखी तक्रार केली असून, हडपसर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे.