याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: अवसरी खुर्द येथील तलाठी कार्यालयात सुरेखा सोपान थोरात यांनी संगणीकृत सातबारा दुरुस्तीबाबत अर्ज केला होता. सोमवारी अर्जदार सुरेखा थोरात यांचे पती सोपान श्रीपत थोरात हे तलाठी कार्यालयात आले व माझा संगणीकृत सातबारा दुरुस्तीबाबत तहसीलदार यांचा आदेश झालेला असताना आपण दुरुस्त का केला नाही? याबाबत वाद घालू लागले. त्यावेळी तलाठी शशांक चौदते यांनी सातबारा दुरुस्ती २०१८ मधील असून त्याप्रमाणे हस्तलिखित करून संगणीकृत सातबारा उतारा दुरुस्त पूर्वीच करण्यात आलेला आहे, असे सांगितले. त्यावेळी थोरात यांनी आमच्या सातबारा उताऱ्यावर पोटखराबा नोंद का घातली नाही, असे म्हणत त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच त्यावेळी तलाठी पुणे-नाशिक हायवे रेल्वे मोजणीच्या शासकीय कामासाठी वडगाव काशिंबेग येथे निघाले असता थोरात यांनी तलाठी यांच्या गाडीची चावी काढून घेतली तसेच तलाठी कार्यालयाच्या दरवाजासमोर बसून राहून शासकीय कामात अडथळा आणून त्यांना धक्काबुक्की केली. तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर खबाले करत आहे.
तलाठ्यास शिवीगाळ, एकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:08 AM