पुणे : शहरामध्ये शासनाच्या ' शिवभोजन ' थाळीला चांगला प्रतिसाद मिळत असून, नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने पुणे शहराचा कोटा तब्बल ३ हजार थाळ्यांनी वाढविला आहे. यामुळे लवकरच शहरामध्ये नव्याने आणखी पाच केंद्रे सुरु करण्यात येणार असून, सध्या सुरु असलेल्या केंद्रांना प्रत्येकी ५० थाळ्या वाढवून देण्यात येणार असल्याची माहिती शहर अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी सांगितले. दरम्यान गरीब व सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या अनुदानावर केवळ दहा रुपयांमध्ये मर्यादित स्वरुपात हे शिवभोजन दिले जाते. परंतु शहरामध्ये अनेक केंद्रांवर आता शिवभोजनच्या लाभार्थ्यांना अधून-मधून मिष्टान्नाचा लाभ मिळू लागला आहे. परिसरातील राजकीय नेत्यांचे वाढदिवसा निमित्त अथवा काही सामाजिक संस्थांकडून शिवभोजनच्या लाभार्थ्यांना गोड पदार्थ अथवा जास्तीच्या अन्नासाठी स्पॉन्सरशिप दिली जात आहे. महा विकास आघाडी सरकारने राज्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात शहराच्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले आहे. यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये ११ ठिकाणी हे केंद्र सुरु करण्यात आली असून, दररोज केवळ १५०० लाभार्थ्यांना शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात येते. परंतु बहुतेक सर्व ठिकाणी दररोज शेकडो लाभार्थी दिवसांचा कोटा पूर्ण झाल्याने मागे फिरून जातात. याबाबत मोरे यांनी सांगितले की, शासनाच्या शिवभोजन थाळीला सर्वच ठिकाणी चांगली मागणी आहे. याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविल्यानंतर पुणे शहरासाठी जास्तीच्या ३ हजार थाळींचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये २ हजार पुणे महापालिका हद्दीत तर १ हजार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत या थाळ््या देण्यात येणार आहे. नव्याने ५ केंद्रे आणखी सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये मार्केट यार्ड, स्वारगेट, महापालिका भवन आणि बुधवार पेठ येथे नव्याने आणखी एक-एक केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. मार्केट यार्डात दररोज ४०० ते ४५० शिवभोजन थाळीची मागणी आहे.
‘शिवभोजन’च्या लाभार्थ्यांना मिष्टान्नाचा लाभ;नेत्यांचे वाढदिवस, संस्थांकडून स्पॉन्सरशिप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 8:13 PM
शहरामध्ये नव्याने पाच केंद्र सुरु होणार
ठळक मुद्देप्रत्येक जिल्ह्यात शहराच्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर शिवभोजन केंद्र सुरु