राजगुरुनगर : खेड तालुक्यात स्वाइन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन सतर्क झाले असून आज आरोग्य विभागाने पंचायत समितीमध्ये दिवसभर कार्यशाळा घेऊन तालुक्यात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. मरकळ येथील अहिल्या किसन लोखंडे (वय ५५) यांचा आज आणि राजगुरुनगर येथील गजानन दत्तात्रय कांबळे (वय ३२, रा. वृंदावन सोसायटी) या दोघांचा स्वाइन फ्लूमुळे १८ तारखेला मृत्यू झाला. लोखंडे यांचा यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर आलेल्या चाचणीत त्यांना स्वाइन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले; तर कांबळे पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले, पण ते वाचू शकले नाहीत, अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी एस. आर. गोरे यांनी दिली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर खेड पंचायत समितीत सभापती सुरेश शिंदे, चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रशांत शिंदे, गटविकास अधिकारी अजिंक्य पवार आणि तालुका आरोग्याधिकारी एस. आर. गोरे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा झाली. कार्यशाळेला वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक व सहायिका, गटप्रवर्तक आणि ‘आशा’ कार्यकर्ती मिळून सुमारे ५०० जण उपस्थित होते. स्वाइन फ्लू होऊ नये, म्हणून घ्यावयाची काळजी, लक्षणे आणि झाल्यावर करावयाची उपाययोजना याबाबत त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रतिबंधक उपाय म्हणून स्वच्छता पाळावी आणि तोंडाला रुमाल बांधावा आदी सूचना करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)स्वाइन फ्लूबाबत माहिती देणारी २०००० पत्रके आरोग्य विभागाने छापली असून त्यांचे तालुक्यात गावोगावी वितरण करण्यात येणार आहे. ताप, शिंका, सर्दी, डोकेदुखी, खोकला, घसादुखी, अतिसार, मळमळ, उलट्या अशक्तपणा, अंगदुखी, धाप लागणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित औषोधोपचार घ्यावेत, असे आवाहन केले आहे.अहिल्या किसन लोखंडे (५५, रा. मरकळ, ता. खेड ) यांना मंगळवारी वायसीएममध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आल्यामुळे, त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी मिळाल्याने त्यांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आजाराचे निदान लवकर न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
खेडमध्ये ‘स्वाइन’चा अलर्ट
By admin | Published: February 21, 2015 12:32 AM