सोमेश्वरनगर : मुरुम (ता. बारामती) येथील प्रसिद्ध व्यावसायिक दशरथ शंकरराव घारे (वय ५८) यांचा स्वाइन फ्लूने शनिवारी (दि. २८) रात्री मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील स्वाइन फ्लूने हा सातवा मृत्यू झाला आहे.८ मार्च रोजी घारे यांना ताप आल्याने लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांना १६ मार्च रोजी पुणे शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, या उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांचे ते मेहुणे होत.दरम्यान, होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे, तसेच आरोग्याबाबत दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. (वार्ताहर)
स्वाइन फ्लूने मुरुम येथील एकाचा मृत्यू
By admin | Published: March 30, 2015 5:28 AM