लक्ष्मण मोरे - पुणे : कोरोना विषाणूच्या दहशतीखाली संपूर्ण जग आलेले आहे. या विषाणूचा धसका यंत्रणांसह सर्वसामान्यांनी घेतला आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अगदी अल्प असल्याचा दावा केला जात आहे. हा सांसर्गिक आजार असल्याने पुण्यात काळजी घेतली जात आहे. परंतु, यापूर्वी आलेल्या स्वाइन फ्लू या एकट्या आजाराने गेल्या दहा वर्षांत ७६८ बळी घेतले आहेत. तर डेंग्यूने आतापर्यंत ४४ आणि क्षयरोगाने (टीबी) २ हजार ७८० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सांसर्गिक आजारांच्या पार्श्वभूमीवर महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणा वर्षभर काम करीत असतात. शासनाने क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू केलेला आहे. स्वाइन फ्लूची साथ ज्या वेळी आली त्या वेळी प्रशासन या आपत्तीला तोंड देण्याच्या तयारीत नव्हते. अचानक उद्भवलेल्या या आजारामुळे यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली होती. नागरिकांमध्ये भीतीची लाट पसरली होती. त्याचा परिणाम बाजारासह शाळा, महाविद्यालयांवरही झाला होता. पुण्यातील गणेशोत्सवावरही सलग दोन-तीन वर्षे या साथीचे सावट होते. या आजारांच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप तरी पुण्यासह महाराष्ट्रात कोरोनामुळे रुग्ण दगावल्याची घटना घडलेली नाही. रुग्णांची संख्याही तुलनेने कमी आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या बहुतांश लोकांच्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. जिल्हा प्रशासन, पालिका यांच्याकडून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले जात आहे. स्वाइन फ्लूूच्या साथीचा ज्या वेळी फैलाव झाला त्या वेळी प्रशासन या आजारापासून अगदीच अनभिज्ञ होते. परंतु, कोरोनाच्याबाबतीत प्रशासनाने पूर्वतयारी केलेली होती. पालिकेने डॉ. नायडू रुग्णालयात महिनाभर आधीच कक्ष तयार केला होता. कोरोनाबाबतची चीनसह जगभरातील अद्ययावत माहिती सातत्याने घेतली जात होती. त्यादृष्टीने आरोग्य विभाग सतर्क होता. त्यामुळे या वेळी स्वाइन फ्लूूच्या वेळी जशी झाली तशी धावपळ आणि गडबड झाली नाही. ............अनेक वर्षांपासून डेंग्यूला आटोक्यात आणण्याकरिता प्रशासन प्रयत्न करीत आहे. वेळोवेळी फवारणी, तपासणी, जनजागृती यावर काम केले जाते. तरीदेखील गेल्या नऊ वर्षांत ४४ बळी डेंग्यूने घेतले आहेत. यासोबतच चिकुन गुनियासारखा आजारही अनेकांना झाला. या आजारामुळे जीवितहानी झाली नसली तरी आयुष्यभराचे दुखणे अनेकांच्या मागे लागले.
आजारामधून बरे झालेल्या अनेकांचे सांधे अजूनही दुखतात. विशेषत: थंडीमध्ये त्यांना अधिक त्रास होतो. केंद्र-राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था क्षयरोग नियंत्रणात ठेवण्याकरिता प्रयत्न करतात. उपचारांपासून जनजागृतीपर्यंत अनेक गोष्टी केल्या जातात. या आजारामुळे शहरात वर्षाला सरासरी १२५ रुग्ण दगावत असल्याची आकडेवारी आहे. .............पुणे शहरात आजारांमध्ये झालेले मृत्यूआजार एकूण मृत्यूस्वाइन फ्लूू (२००९ ते २०१९) ७६८डेंग्यू (२०१० ते २०१९) ४४क्षयरोग (२००५ ते २०१८) २,७८०