पुणे : पाच वर्षांपूर्वी स्वाइन फ्लूने शहरात हाहाकार माजविला होता. मात्र, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने राबविलेल्या पुणे पॅटर्नमुळे ही साथ आटोक्यात आणण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले होते. गेल्या महिनाभरात पुन्हा या आजाराने डोके वर काढले असून, १ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत शहरात या आजाराची लागण झालेले तब्बल ४३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांतील ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यांतील २ रुग्ण पुणे शहरातील असून, इतर रुग्ण महापालिका हद्दीबाहेरील आहेत. तर, या महिनाभरात शहरातील १७ हजार ७९३ जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यांतील १,२८८ संशयित रुग्णांवर टॅमीफ्लूचे उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर, अद्यापही शहरातील तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ११ जणांवर उपचार सुरू असून ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.स्वाइन फ्लूच्या एच १ एन १ या विषाणूला थंडीचे वातावरण पोषक आहे. वातावरणात आर्द्रता जास्त असल्याने या विषाणूचा वेगाने प्रसार होतो. गेल्या महिनाभरात शहराच्या थंडीत सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. मात्र, त्यात प्रामुख्याने शहराबाहेरील रुग्ण अधिक आहेत. या विषाणूविरोधात बहुतांश पुणेकरांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून तसेच राज्यातील इतर शहरांमधील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. - डॉ. एस. टी. परदेशी, प्रभारी आरोग्यप्रमुख
स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले
By admin | Published: February 06, 2015 12:24 AM