- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला पुरविण्यात येणारी स्वाइन फ्लूची लस ‘जीएसटी’च्या कचाट्यात अडकली आहे. जीएसटीचे दर निश्चित झाले नसल्यामुळे पुरवठादाराकडून लसीचा पुरवठा होत नसल्याने महापालिका रुग्णालयात स्वाइन फ्लूची लस उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाली आहे. महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या बैठकीत डेंग्यू व स्वाइन फ्लू रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. या वेळी जीएसटीचे दर निश्चित झाले नसल्याने पुरवठादाराकडून लसीचा पुरवठा होत नसल्याची बाब समोर आली. या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, उषा मुंढे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, सहायक आयुक्त विजय खोराटे, अण्णा बोदडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्याधिकारी गणेश देशपांडे आदी उपस्थित होते.बैठकीमध्ये सद्य:स्थितीत महापालिका व खासगी रुग्णालयांत डेंग्यू व स्वाइन फ्लूचे उपचार आदींचा आढावा घेण्यात आला.दरम्यान, १ जुलैपासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाला आहे. याचा फटका स्वाइन फ्लूच्या लसीला बसला आहे. जीएसटीचा दर निश्चित झाला नसल्यामुळे पुरवठादाराकडून लस पुरविली जात नसल्याचे समोर आले आहे. यामुळे लसीची कमतरता भासत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत असून जानेवारी ते जुलै या सात महिन्यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाल्याच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली.