लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : श्रावण सुरू होण्यास काही दिवसच उरल्याने ठिकठिकाणी जोरदार आखाड पार्ट्या रंगू लागल्या आहेत. ही संधी साधून वाहतूक पोलिसांपैकी काही जण बक्कळ कमाई करू लागल्याचे चित्र शहरात फुगेवाडी, आकुर्डी, रावेत, मोशी परिसरात पहावयास मिळत आहे. महत्त्वाच्या ठिकाणी थांबून मद्यपान करून येणारा वाहनचालक दिसून येताच, त्याला थांबवायचे. मद्यपान करून वाहन चालविणे गुन्हा असल्याची जाणीव करून द्यायची. शिवाय हेल्मेट नाही, प्रदूषणाबाबतचा दाखला आहे का? याची विचारणा करायची. काही ना काही कमतरता जाणवतेच, त्या वेळी त्या वाहनचालकांकडे दंड स्वरूपात मोठ्या रकमेची मागणी करायची. विनवण्या करू लागल्यास त्याच्याकडून मिळेल तेवढी ‘रोख’ रकमेची वसुली जोरात सुरू आहे. दिवसा वाहनचालकाला अडविल्यास लगेच वाहनापर्यंत स्वाइप मशिन घेऊन जाणारे वाहतूक पोलीस रात्री मात्र स्वाइप मशिनशिवाय दंड आकारण्यात येतो. रात्री पाचशे रुपये घेतले, तर दोनशे रुपयांची पावती करायची, उर्वरित रक्कम स्वत:च्या खिशात टाकायची, असे वाहतूक पोलिसांचे प्रताप सुरू आहेत. अशा तक्रारी नागरिक करू लागले असून या प्रतापाविषयी उघडपणे बोलले जात आहे. आषाढ पार्ट्यांचा काळ हा वाहतूक पोलिसांच्या दृष्टीने सुगीचा काळ ठरू लागला आहे. दिवसा एखाद्या वाहनचालकाला अडवले त्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असेल तर त्याचे काही ऐकूण न घेता, स्वाइप मशिन घेऊन वाहतूक पोलीस दंड घेण्यास पुढे सरसावतात. पूर्वीसारखी वाहनचालकांना खिशात दंड भरण्याइतकी रक्कम नाही, अशी सबब सांगता येत नाही. खिशात एटीएम कार्ड असेल तर स्वाइप करा, असा पर्याय वाहतूक पोलीस त्यांच्यापुढे ठेवतात. त्यांना कार्ड स्वाइप करून दंड भरणे क्रमप्राप्त ठरते. वाहतूक पोलिसांना दिलेल्या या स्वाइप मशिन रात्री वापरू नयेत, असे काही वरिष्ठांनी त्यांना आदेश दिलेले नाहीत. जाणीवपूर्वक स्वकमाईसाठी रात्री काही पोलिसांनी ठिकाणे निश्चित केली आहेत. आषाढ पार्ट्या रंगण्याच्या कालावधित रात्री दीड दोन तासांत हजार दीड हजारांची कमाई होत असल्याने स्वयंस्फूर्तीने अशा वाहतूक पोलिसांचा ‘ओव्हरटाइम’ सुरू आहे. विशिष्ट ठिकाणी रात्री येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांच्याकडून दंडाची भीती दाखवत रक्कम उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांबाबत नागरिक तक्रार करू लागले आहेत. परंतु, या बाबत थेट आपल्याकडे अशा काही तक्रारी आलेल्या नाहीत, असा काही प्रकार घडत असेल तर त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल. संबंधित विभागाच्या प्रमुखांना याबाबत सूचना दिल्या जातील. दोषी आढळून येणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. - राजेंद्र भामरे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग
दिवसा ‘स्वाइप’ अन् रात्री ‘रोख’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 6:13 AM