पुणे : पुण्यात पुन्हा एकदा कोरोनाचे सावट गडद होताना दिसत आहे. लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. कोरोना आहे की नाही इतपत शंका उपस्थित व्हावी अशाप्रकारे लोक बिनधास्तपणे परिस्थिती हाताळत आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून आटोक्यात असलेली कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिका व जिल्हा प्रशासन कोरोना निर्बंधाबाबत कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर कंटेन्मेंट झोन रद्द करून नागरिकांवरील निर्बंधात सुद्धा शिथिलता आणण्यात आली होती. तसेच खासगी चारचाकीत कुटुंबासह विनामास्क प्रवासासाठी मुभा देखील देण्यात अली होती. मात्र, नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग बाबतचे सर्वच नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने पुन्हा एकदा कोरोना संकट डोके वर काढू लागले आहे. याच धर्तीवर महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर कडक निर्बंध लादण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात लग्नसमारंभ, उत्सव, सभा, यांवर कडक निर्बंध येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत प्रशासनाकडून अंतर्गत पातळीवर जोरदार हालचाली सुरु असल्याचे देखील बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश.. राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुण्यात आजपासून मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाईला प्रारंभ होणार आहे. तालुका स्तरावर कोरोनाची आढावा बैठक होऊन निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नागरिक व व्यावसायिकांवर कठोर कारवाईचे आदेश
वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे शहरातील मंगल कार्यालये, सिनेमा हॉल, हॉटेल, मॉल यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नागरिक व व्यावसायिकांवर कठोर कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहे. तसेच या कारवाईसाठी शहरात स्वतंत्र पथके देखील तयार करण्यात आले असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
शहरातील 'या' परिसरात वाढतेय कोरोना रुग्णसंख्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सिंहगड रस्ता, वारजे, नगर रस्ता, बिबवेवाडी, शिवाजीनगर, येरवडा, औंध, बाणेर,कोथरूड या परिसराचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर प्रशासन पुन्हा एकदा कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे.