चाकण : संतोष वाळकेच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने काल (दि. १८) रात्री पावणेबाराच्या सुमारास म्हाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे विशाल नारायण भोसले (वय २६) या युवकावर कोयता व तलवारीने वार करण्यात आले.या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून, दत्ता वाळकेसह आणखी एकास अटक करण्यात आली असून, इतर आरोपी फरार आहेत. अटक केलेल्या आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी दत्ता जनार्दन वाळके (वय ४०) व भाऊसाहेब बबन वाळके यांना अटक केली आहे. आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. फरार आरोपींचा तपास पोलीस घेत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ११ फेब्रुवारी २०११ रोजी म्हाळुंगे इंगळे येथे संतोष जनार्दन वाळके या तरुणाचा माथाडी ठेकेदारीच्या वादातून खून झाला होता. या प्रकरणी चाकण पोलिसांनी १५० पेक्षा जास्त लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेला ४ वर्षे झाली. आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने काल (दि. १८) रात्री पावणेबाराच्या सुमारास दत्ता जनार्दन वाळके, राहुल संजय पवार, मंगेश रसाळ, संकेत अशोक शिवळे, भाऊसाहेब बबन वाळके (सर्व रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) व इतरांनी येथील भोसले वस्तीवर विशाल भोसले याचा स्कॉर्पिओ गाडीने पाठलाग करून त्याच्या डोक्यावर, मानेवर व हातावर कोयता, तलवारीने वार करून काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले व स्कॉर्पिओ गाडी सोडून आरोपींनी पलायन केले. विशालची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर आदित्य बिर्ला रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
खुनाचा बदल्यासाठी युवकावर तलवारीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2015 4:17 AM