पुणे : खडकवासला धरण प्रकल्पातील पाणलोटक्षेत्रात कालपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातीलपाणीसाठ्यात एक टीएमसीने वाढ झाली. प्रकल्पातील एकूण पाणीसाठा आता१०.६६ अब्ज घनफूट ( टीएमसी) झाला आहे.त्यामुळे गणेश महोत्सवापूर्वी शहरात कोणत्याही प्रकारची पाणी कपात करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. या स्पष्टीकरणानंतर पुणे शहरावरील पाणीकपातीची टांगती तलवार तूर्तास तरी दूर झाली आहे.
पुणे कपात न करण्याचा निर्णयावर महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे शहरासह जिल्ह्यात गेले काही दिवस मोठ्या स्वरूपाच्या पावसाने उघडीप घेतली होती.त्यामुळे पाटबंधारे खात्याकडून शिल्लक पाणीसाठ्याबाबत नियोजन करून पाणी कपात करण्याचे धोरण होते. मात्र,कालपासून शहर व धरण पाणलोट क्षेत्रात चांगल्या प्रकारे पाऊस झाला आहे. तसेच वेध शाळेने १५ ऑगस्टनंतर शहर व जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे गणेश महोत्सव होईपर्यंत तरी कुठल्याही प्रकारची पाणी कपात करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा पूर्ण क्षमतेने होता. त्यामुळे पाणी कपात करण्याची गरज नव्हती. जूनपासून पावसाळा सुरू झाल्यापासून जोरदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे पाणी साठ्यात समाधानकारक वाढ होऊ शकली नाही. पाऊस नाही आणि संपत चाललेला पाणीसाठ्यामुळे नियोजन करून पाणी कपात करणार असल्याचे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. आता खडकवासला प्रकल्पाचे पाणी शेतीलाही देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्याचा फायदा दौंड, इंदापूर मधील शेतीला होईल........... सोमवार सकाळपासून (सकाळी ६) मंगळवार संध्याकाळपर्यंत (सायंकाळी ६) ३६ तसांत खडकवासला धरण प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस आणि धरणांतील पाणीसाठा: खडकवासला: ४४ मिमी, ३७.१५ टक्के. पानशेत: १०१मिमी, ४२.९७ टक्के. वरसगाव: १०५ मिमी, ३५.४७ टक्के. टेमघर: १३० मिमी, २२.०५टक्के. प्रकल्पातील एकूण पाणीसाठा ३६.५८टक्के. ....खडकवासला धरण प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणी कपातीची तूर्तास गरज नाही. प्रत्येक सप्ताहात पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात येणार आहे. जोरदार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन तो ८० ते ९० टक्के झाल्यावर शेतीसाठी पाणी सोडण्यात येईल. विजय पाटीलकार्यकारी अभियंता, खडकवासला धरण प्रकल्प