देहूगाव (पुणे) : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र देहूतील गट नं. ९७ या गायरान जमीनीचा देहूच्या विविध प्रकल्प व विकासाकामांसाठी तसेच भाविकांच्या सोयी सुविधांसाठी उपयोगात आणण्यासाठी करण्यात येणार असल्याने ते कोणालाही देऊ नये. या गायरान जमिनीचा बचाव करण्यासाठी देहूकारांनी आपल्या परंपरेनुसार टाळ मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर उपजिल्हाधिकारी संजय असवले आणि अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांसह सर्वानीच कडकडीत बंद ठेवून मोर्चाला पाठिंबा दर्शवला होता. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. श्री संत तुकाराम महाराज संस्थान, नगरसेवक-नगरसेविका, देहूकर ग्रामस्थ, वारकरी, सेवेकरी यांनी महाद्वार चौक मुख्य मंदिरापासून सकाळी सव्वा दहाच्या सुमारास टाळ वाजवीत दिंडी मोर्चा काढला. १४ टाळकरी कमान मार्गे दिंडी मोर्चा मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर मोर्चेचे सभेत रूपांतर झाले.
संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे, नगरसेवक योगेश परंडवाल, शैलेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, तीर्थक्षेत्र देहूत भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गावची पूर्वी १० हजार असणारी लोकसंख्या वाढून ७० हजारांवर पोहचली आहे. मात्र जागा व हद्द मर्यादित असल्याने भूभागही मर्यादितच आहे. वाढती लोकसंख्या आणि भाविकांसह ग्रामस्थांच्या विविध सोयी सुविधा, विविध प्रकल्प व योजनांसाठी देहूतील गायरान जमीन उपयोगात येणार असून ती ही कमी पडणार आहे. त्यामुळे गायरान जागा कोणालाही देऊ नये. कोणतही निर्णय घेण्यापूर्वी देहू नगरपंचायतचे लोकप्रतिनिधी व प्रशासन आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष विश्वस्त आणि ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा पवित्र घेतला जाईल. असा इशाराही यावेळी देण्यात आला.
उपजिल्हाधिकारी संजय असवले, हवेली अप्पर तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांना निवेदन देण्यात आले. आपले म्हणने वरिष्ठांना कळविण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार निकम यांनी यावेळी दिले. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव, ग्रामतलाठी सूर्यकांत काळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.