कळस : जगदगुरु संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मंगळवार (दि.२०) रोजी इंदापुर तालुक्यातील दुसर्या मुक्कामासाठी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास अंथुर्णे गावात दाखल झाला. सकाळी सणसर येथुन प्रस्थान ठेवलेल्या सोहळ्याने बेलवाडी येथील गोल रिंगण करुन लासुर्णे, जंक्शन विसावा घेत अंथुर्णे मुक्कामी विसावला सोहळ्यातील वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
पालखी सोहळा गावाच्या वेशीवर दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले, वैष्णवांमध्ये मोठा उत्साह, आनंदाचे वातावरण तयार झाले. यंदा पालखी सोहळ्याचे ३३८ वे वर्ष आहे. पालखी सोहळ्यात टाळ - मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी, कपाळी गंध, मुखाने हरिनाम अशा या वातावरणाने मंत्रमुग्ध झालेल्या लाखो वारकऱ्यांसह तालुक्यातील ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. सायंकाळी तालुक्यातील दुसऱ्या मुक्कामासाठी अंथुर्णे गावात पालखी सोहळा आल्यानंतर लेझीम पथकाने स्वागत केले. त्यानंतर धोतराच्या पायघड्या घालून ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी आदरातिथ्य केले. पालखी तळावर सायंकाळी विसाव्यासाठी आगमन झाले. यावेळी आरती झाली लासुर्णे, जंक्शन येथील स्वागत आटोपून पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी दाखल झाला. ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले याठिकाणी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती.
येथे सुमारे २५ एकरावर नविनच पालखी तळ निर्माण केला असून भव्यदिव्य सुखसुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. सुमारे ५ हजार चौरसफुटाचा कायमस्वरूपी पत्रा शामियाना उभारण्यात आला आहे. तसेच विजेच्या सोयीसाठी १३ हँलोजन उभारण्यात आले आहेत. अतिक्रमण टाळण्यासाठी सुमारे २५ एकर क्षेत्राला दगडी भिंत बांधण्यात आली आहे. अंतर्गत रस्त्याचे जाळे निर्माण करण्यात आले असून वृक्षारोपण केल्याने सावलीची सोय तयार झाली आहे.