लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांना टॅॅबचे वाटप करण्यात येत आहे. विभागाने ६५ हजार टॅॅब खरेदी केले असून, त्याचे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
कोरोना काळात बहुतांश शाळात ऑनलाइन शिकवणे सुरू आहे. भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडे अशी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना टॅॅब उपलब्ध करून देण्याचा निर्णय अमलात आणला गेला. राज्यातील आश्रमशाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीचे असे विद्यार्थी व त्यांचे शिक्षक मिळून ६५ हजार इतकी संख्या आहे. मंत्रालय स्तरावरून या ६५ हजार टॅबची खरेदी करून त्याचे जिल्हानिहाय वितरणही झाले आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण त्वरित सुरू करण्याची सूचना देण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील ९० शिक्षकांना टॅॅब वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे समाजकल्याण सहायक आयुक्त संगीता डावखर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “प्रशिक्षणानंतर सर्व जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांना टॅॅबचे वाटप करण्यात आले. टॅॅबची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यावर संयुक्तपणे टाकण्यात आली आहे.” टॅॅब वाटप कार्यक्रमाला समाज कल्याण निरीक्षक गोपीचंद आल्हाट, लिपिक धनाजी काशीद, तालुका समन्वयक श्वेता देशमुख, मनीषा कणसे यांची उपस्थिती होती.