पुणे : देशभरातील सुमारे २००० ते ३००० शहरांमध्ये लष्कराच्या जागा आहेत. त्यातील काही शहरांमध्ये विकास प्रकल्पांसाठी संरक्षण खात्याच्या जागेची आवश्यकता असून, त्या तत्काळ मिळाव्यात यासाठी स्वतंत्र धोरण तयार करावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय प्रसारणमंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांनी आज दिली. या जागा मिळविण्यासाठीचे प्रस्ताव वर्षानुवर्षे पडून असल्याने ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी स्वतंत्र धोरणाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी संरक्षणमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले. खासदार जावडेकर यांनी आज पुणे शहरातील केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची माहिती घेण्यासाठी महापालिका प्रशासन तसेच सर्वपक्षांच्या राजकीय पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच, या प्रश्नांबाबत संबंधित विभागांशी चर्चा करून महापालिकेस सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जावडेकर म्हणाले, की देशभरात संरक्षण खात्याच्या जमिनी आहेत. सुमारे २०० ते ३०० शहरांमध्ये या जमिनी आहेत. त्या जागांमधील विकासकामांच्या परवानगींची प्रक्रिया सुटसुटीत करण्याची गरज आहे. अनेक शहरांमध्ये या जागा वर्षानुवर्षे मिळत नसल्याने अनेक विकासकामे रखडतात, त्यामुळे असे रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी संरक्षण विभागाशी चर्चा करून स्वतंत्र धोरण करण्याची मागणी करण्यात येणार आहे. बीडीपीमधील राजकीय पक्षांच्या मागणीबाबत मात्र त्यांनी मौन साधले. (प्रतिनिधी)
लष्कराच्या जागेसाठी प्रयत्नशील
By admin | Published: June 15, 2014 3:57 AM