लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मंगळवार पेठेतील शासकीय कॅमेरे हलविल्याप्रकरणी पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या तडीपार गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले.
प्रतीक पृथ्वीराज कांबळे (वय २९, रा. मंगळवार पेठ) असे त्याचे नाव आहे. त्याचा साथीदार कुमार चव्हाण याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. प्रतिक कांबळे याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारामारी, हत्यार बाळगणे अशा प्रकारचे १० गुन्हे दाखल आहे. त्याला पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तरीही तो शहरात येऊन दहशत पसरवित होता.
पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले यांना तडीपार गुंड कांबळे याने मंगळवार पेठेत लावलेले शासकीय कॅमेरे हलविल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे ते १८ एप्रिलला कर्मचार्यांसह आरोपींना पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी कांबळे याने वाडेवाले यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. पण, वाडेवाले यांनी वार चुकविल्यामुळे ते बचावले. त्यावेळी आरोपी कुमार चव्हाण याने विट उचलून वाडेवाले यांच्याबरोबर असलेल्या पोलिसांवर हल्ला केला. दरम्यान तोपर्यंत कांबळेने पलायन केले होते.
याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे. कांबळे हा बुधवार पेठेतील सपना बिल्डींगसमोर दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यानुसार पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे. अधिक तपासासाठी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.