लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तडीपार केले असताना भवानी पेठेतील चुडामण तालीम चौकात येऊन हैदोस घालणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने पकडले.
अरबाज ऊर्फ बब्बन इक्बाल शेख (वय २३, रा. भवानी पेठ) असे या गुंडाचे नाव आहे. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी अरबाज शेख व त्याच्या टोळीला ४ जानेवारी २१ रोजी २ वर्षांकरिता पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. असे असताना तो तडीपारीचा भंग करून शहरात आला होता. भवानी पेठेतील चुडामण तालीम चौकात तो कोयता घेऊन मोठ मोठ्याने आरडाओरडा करून स्थानिक लोकांना शिवीगाळ करून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकातील पोलीस अंमलदार अजय थोरात यांना मिळाली.
त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, संजय गायकवाड व त्यांच्या सहकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांना पाहून शेख पळून जाऊ लागला. तेव्हा त्याचा पाठलाग करून पकडण्यात आले. त्यांच्याकडून कोयता जप्त केला. त्याच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र जवळ बाळगून दहशत निर्माण करणे, घरफोडीचा गुन्हा दाखल असून खडक पोलीस ठाण्यात खंडणी व चोरीचा प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे़ असे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत.