पुणे : कोंढवा पोलिसांनी तडीपार केलेल्या गुंडाला गेल्या आठवड्यात पंढरपूरला नेऊन सोडले होते. मात्र, पोलिसांची पाठ वळताच तो पुन्हा पुण्यात आला. त्याने कोंढव्यातील ज्योती चौकातील क्वीक पिझ्झा या दुकानातील कामगाराला बेदम मारहाण केली. रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
साईराज राणाप्रताप लोणकर(वय २१, रा. पांडुरंग आळी, कोंढवा गावठाण) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. त्याला पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी २ वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी त्याला २८ फेब्रुवारी रोजी पंढरपूरला नेऊन सोडले होते. साईराज लोणकर याच्यावर शरीराविरुद्धचे ५ गुन्हे कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, तडीपार केल्यानंतरही तो पुण्यात आला होता. रविवारी रात्री तो स्मशानभूमीच्या येथे दारु पित बसला होता. त्यावेळी त्याने एकाला ज्योती चौकातील क्वीक पिझ्झा या दुकानातून पिझ्झा आणायला सांगितले. तेथे आलेल्याने साईराजभाईने पिझ्झा मागितला आहे. लवकर दे असे सांगितले. तेव्हा दुकानचालक परवेज सय्यदही तेथे होते. तेथील कामगार जझीर शेख याने वेळ लागेल असे सांगितले. तेव्हा त्या माणसाने साईराजला फोन करुन सांगितले. तेव्हा साईराज तेथे आला व त्याने तु मला ओळखत नाही का असे म्हणून कोयत्याने शेख यांना बेदाम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात काम सुरु होते.
गेल्या आठवड्यात तडीपार केलेला गुंड पुन्हा हद्दीत येऊन राडा करत असल्याबाबत कोंढवा पोलिसांना त्याची काहीही माहिती नव्हती.