पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरविणे, लूटमार करणे, खुनाचा प्रयत्न करणे, मारामारी, तोडफोड करणे, अपहरण, अपहार, फसवणुकीसारखे प्रकार करणाऱ्या यश साहोता टोळीतील ७ जणांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
यश प्रशांतसिंग साहोता (वय २१, रा. वेणुसदन, अपार्टमेंट, आंबेगाव पठार), दीपक किसन तारेमकर (वय २३, रा. आंबेगाव पठार), आकाश बापू म्हस्के (वय २४, रा. आंबेगाव पठार), निखिल सखाराम आखाडे (वय २६, रा. मोहननगर, धनकवडी), ओंकार श्रीनाथ कटके (वय २६, रा. मोहननगर, त्रिमूर्ती चौक) जयेश शिवलाल परमार (वय १९, रा. आंबेगाव पठार) आणि स्वप्निल उत्तम उबाळे (वय २० रा. आंबेगाव खुर्द, दत्तनगर) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा बढे, अमंलदार चंद्रकांत माने, महेश बारावकर, अमित शेडगे यांनी पुरावे गोळा करून पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्याकडे तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार त्यांनी सातही जणांना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. सात जणांची सोलापूर, उस्मानाबाद, सातारा या ठिकाणी रवानगी करण्यात आली आहे.