पुणे : पुणे शहरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवून त्यात तडीपार गुन्हेगार, रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. या आदेशप्रमाणे तपासणी करीत असताना बिबवेवाडी पोलीस ठाण्याकडून तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी अटक केली.
आकाश बाळू तुपसुंदर (वय २९, रा. सरगम चाळ, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे त्याचे नाव आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे निरीक्षक शब्बीर सय्यद, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार आदर्श चव्हाण, अभिजित रत्नपारखी हे पासलकर चौकात रात्री आले असताना त्यांना तडीपार गुंड तुपसुंदर हा काकडे वस्तीत आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तो शहरात आला होता. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात चौकशी करता परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्तांनी तुपसुंदर याला २४ जुलै २०२० मध्ये पुणे शहर व जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार केले होते. आकाश तुपसुंदर याला अटक करण्यात आली असून पोलीस अंमलदार योगेश कुंभार अधिक तपास करीत आहेत.