सोमेश्वरनगर : मुरुम (ता. बारामती) येथील म्हसोबावस्ती ते मुरुमढोक रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, असा आदेश तत्कालीन तहसीलदार हनुमंत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी दिला होता. मात्र शेतात जाण्यासाठी असलेला हा रस्ता खुला करण्यात आला नसल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार का टाकू नये, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या साडेतीन वर्षांपासून शेतात जाणारा हा रस्ता बंद असल्याने येथील १५० एकरांवरील शेती रस्त्याअभावी धोक्यात आली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने येथील ऊस आणि इतर पिके शेताबाहेर काढण्यासाठी शेतकºयांना काही वेळेला पैसे मोजावे लागतात. शेतातील रस्त्याचा वाद मिटविण्यासाठी शेतकºयांनी तत्कालीन तहसीलदार हनुमंत पाटील यांची भेट घेत यातून मार्ग काढण्याची विनंती केली होती. पाटील यांनी तत्काळ रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. परंतु यानंतरही महसूल आणि पोलीस खात्यांनी गांभीर्याने घेतली नसल्याने ३६ कुटुंबे हतबल झाली आहेत. आमदार आणि खासदार यांना याबाबत तोंडी व लेखी माहिती दिल्यानंतर त्यांनी स्थानिक पदाधिकाºयांना यातून मार्ग काढण्यास सांगितले; मात्र कुणीही याबाबत गांभीर्याने न घेतल्याने येणाºया निवडणुकीत मतदानावर बहिष्कार का घालू नये, असा सवाल या शेतकºयांनी उपस्थित केला आहे.
सोमेश्वर कारखाना स्थापनेपासून या ठिकाणी असलेल्या म्हसोबा लिफ्टवर आणि येथील शेतात जाण्यासाठी रस्ता होता. तेव्हापासून येथील ऊस गाळपासाठी याच रस्त्याने कारखान्याला नेण्यात आला. मात्र सन २०१६ पासून अचानक हा रस्ता कुठे गायब झाला, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. गट क्रमांक ६९५ मध्ये असलेला हा रस्ता ५० वर्षांपेक्षा जास्त काळ वापरात असूनही बंद करण्यात आला आहे. मात्र याकडे स्थानिक राजकारण्यांना लक्ष देण्यास वेळ नसल्याने शेतकरी दुसºया शेतकºयाला रस्त्यासाठी पैसे देऊन आपल्या शेतातील पिके शेताबाहेर काढत आहेत.गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थांनी रस्त्याबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र यात त्यांना यश आले नाही. हा रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. आता यावर कोण मार्ग काढणार, हे येणारा काळच ठरवेल.