बहीण पुन्हा लाडकी कधी होणार? बारामतीत ताई-दादा एकाच कार्यक्रमात पण बोलणं टाळलं…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 19:09 IST2025-01-11T19:09:25+5:302025-01-11T19:09:54+5:30
या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका एेन वेळी मिळाल्याने खासदार सुप्रिया सुळे या नाराज होत्या.

बहीण पुन्हा लाडकी कधी होणार? बारामतीत ताई-दादा एकाच कार्यक्रमात पण बोलणं टाळलं…
बारामती - लोकसभेच्या निवडणुकीनंतर बारामती परीसरात कोणत्याही कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र व्यासपीठावर आलेले नाहीत. मात्र तालुक्यातील अंजनगावच्या वीज वितरण केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आमनेसामने आल्याचे पहावयास मिळाले.
या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका एेन वेळी मिळाल्याने खासदार सुप्रिया सुळे या नाराज होत्या. त्यांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री व ऊर्जा खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून स्पष्ट केली. मात्र, या नाराजी नंतर ही सुप्रिया सुळे या अंजनगाव मध्ये पोहोचत सहभागी झाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अगोदर त्या अंजनगाव मध्ये पोहोचल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांची प्रतीक्षा करत थांबल्या होत्या. त्यानंतर हा उद्घाटन सोहळा दोघांच्याही उपस्थितीत पार पडला. या निमित्ताने हे दोघे पहिल्यांदाच बारामतीत एकत्र कार्यक्रमात दिसून आले. उदघाटनानंतर सुळे पुढील कार्यक्रमासाठी निघुन गेल्या.मात्र,संपुर्ण कार्यक्रमात दोघांनी एकमेकांशी बोलणे टाळल्याचे यावेळी दिसुन आले.