--------------
भिगवण : इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गाव हे झिका आजाराच्या संसर्गाच्या दृष्टीने संवेदनशील घोषित केले असले तरी ग्रामपंचायत प्रशासन मात्र यांबाबत कोणतीही उपाययोजना करताना दिसून येत नसल्याचे वास्तव पाहवयास मिळत आहे. गावात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून कोरोनाचे रुग्णवाढीबरोबरच इतर आजारांचे रुग्ण ही या गावात वाढत असल्याने यावर ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गाव हे मागील तीन वर्षांपासून डेंग्यू आणि इतर डासांपासून होणाऱ्या आजार विषयी संवेदनशील गाव म्हणून प्रशासनाने जाहीर केलेले आहे. डेंग्यूच्या उद्रेकावेळी ‘लोकमत’ने बातमी प्रसारित केली असता तक्रारवाडीसारख्या छोट्या गावात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी आरोग्य पथकासह भेट देत सर्व त्या उपाययोजना करून आजारावर नियंत्रण मिळविले होते.
आरोग्य प्रशासन प्रत्येक वेळी सर्वेक्षण करणे, जनजागृती करणे आणि रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचे काम करीत असते त्याला ग्रामपंचायत प्रशासनाने मदत करणे गरजेचे असते मात्र सध्या तक्रारवाडी ग्रामपंचायत प्रशासनाकडून आरोग्य प्रशासनालाना पुरेसे सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आरोग्य प्रशासन अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. रस्त्यावरील अतिक्रमण गावात डुकरांच्या सुळसुळाट, रस्त्यावर पाळीव जनावरांच्या गोठे यामुळे डासांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे अनेक जण आजारी पडत आहेत तरी देखील ग्रामपंचायत पातळीवर जनजागृती केली जात नसल्याचेही आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
त्यामुळे अनेक वेळा हवेतील बदलामुळे आजारी पडत असल्याचे समज करून खासगी दवाखान्यातून उपचार केले जात आहेत. वेळ निघून गेल्यावर निदान झाल्यास ते जीवावर बेतू शकते याची माहिती या गावाला आहे. कारण यातच गावातील होतकरू तरुणाचा जीव गेल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे.
त्यामुळेच तक्रारवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने फवारणी, जनजागृती आणि इतर उपाययोजना करण्याची गरज असून ‘बैल गेला आणि झोपा केला’ या म्हणीप्रमाणे वेळ निघून गेल्यावर उपाययोजना करून काही साध्य होणार नसल्याचे वास्तव चित्र आहे.
याबाबत तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गावात तातडीने फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. आरोग्य विभागाच्या मदतीने जनजागृती करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. आम्ही सर्व पदाधिकारी या आजाराच्या दृष्टीने माहिती घेत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता बरे न वाटल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेण्याचे आवाहन करीत आहे.
--------