पुणे: कुडजे गावातील फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकत बाराबालांसोबत ओली पार्टी करीत असलेल्या पालिकेच्या अधिकारी व नोंदणीकृत ठेकेदारांना अटक केली आहे. स्वाब चाचणी केंद्राची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याकडून हे गैरवर्तन घडले आहे. या अधिकाऱ्यासह ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली आहे.
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक नियमलागू केले असून संचारबंदीच्या काळातही नियम असताना ही सगळी मंडळी ठिकाणी कशी गेली असा प्रश्न आहे. अधिकाऱ्यांकडून बेजबाबदारपणाचे आणि पालिकेच्या प्रतिमेस बाधा आणणारे आहे. सुजाण नागरिक, सामाजिक संस्था, नगरसेवकांनी पालिकेतील भ्रष्टाचारावर तसेच कामे न करता बिले निघत असल्याच्या प्रकारावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या छाप्यामुळे पालिकेच्या कामातील भ्रष्टाचार समोर आला आहे. या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी तसेच ठेकेदारांच्या कामांची तपासणी करण्यात यावी. ठेकेदारांच्या सर्व कामांची तपासणी करून त्यांचा दर्जा व त्यांना अदा केलेली बिले याची त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धुमाळ व बागवे यांनी केली आहे.-----हा प्रकार गंभीर आहे. याची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार अधिकारी निलंबित करण्यात आला आहे. ठेकेदारांच्या कामाची चौकशी प्रशासनामार्फत केली जाईल.- गणेश बिडकर, सभागृह नेते