आव्हाळवाडी : हायब्रीड अॅन्युइटी अंतर्गत वाघोली येथे करण्यात येत असलेल्या पुणे-नगर महामार्गाचे काम नियमाप्रमाणे होत नसून ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वाघोलीच्या माजी उपसरपंच कविता दळवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
वाघोली गावांमध्ये पुणे-नगर महामार्गाचे हायब्रीड अॅन्युइटी अंतर्गत काम चालू असून बेल्हेकर पाटील हे काम करीत आहेत. यामध्ये बिल्टअप एरिया ११/१०० ते १२/३००, १५/१०० ते १२/५०० या ठिकाणी प्रत्येक शंभर मीटरवर युटीलिटी क्रासिंग पाईप टेंडर स्कोपप्रमाणे करणे गरजेचे होते. वाघोली परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. युटीलिटीमध्ये टेलिफोन केबल, गॅस लाईन, पाण्याची लाईन, विद्युत लाईन या रस्ता क्रॉसिंग करताना युटीलिटी पाईप न टाकल्यामुळे समस्या निर्माण होणार आहे. अधिकाऱ्याचे ठेकेदाराशी असलेल्या संगनमतामुळे याचा त्रास नागरिकांना होणार असून टेंडर स्कोपप्रमाणे युटिलिटी करणे गरजेचे आहे. परंतु प्रत्यक्षात टेंडर्सप्रमाणे काम होत नाही. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करून खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी दळवी यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांचेकडे केली आहे.
प्रतिक्रिया :
पुणे-नगर महामार्गावर चालू असलेल्या कामामध्ये कंत्राटदाराचे ४० टक्के आणि शासनाचे ६० टक्के योगदान असल्याने कामाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी अभियंता नेमलेले आहेत. स्वतंत्र नेमलेल्या अभियंत्याची कार्यपद्धती या कामाच्या विकासासाठी/अंमलबजावणी करणे जबाबदारी असून शाखा अभियंत्याची नाही. निविदा अटींच्या संदर्भात प्रदान केलेल्या डिझायनरच्या सबमिशननुसार युटीलिटीसाठी रस्त्यावरील पाईप्स आवश्यकतेनुसार कार्यान्वित करणे आवश्यक आहे.
- श्रीपाद बालशेट्टवार (शाखा अभियंता, सा. बां. विभाग)