लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देहूरोड (पुणे) ते सातारा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण काम समाप्तीच्या मूळ अपेक्षित तारखेला ३१ मार्च रोजी ८ वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु, केंद्रीय भूपृष्ठ वहन मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतरही हे काम पूर्ण न करणाऱ्या एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केली आहे.
याबाबत मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले की, पुणे सातारा चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम १ ऑक्टोबर, २०१० रोजी सुरू झाल्यावर ते ३१ मार्च, २०१३ पर्यंत होणे अपेक्षित होते. पण हे काम पूर्ण न झाल्याने संबंधित ठेकेदार कंपनीला गेली ८ वर्षे सतत मुदतवाढ दिली. दरम्यान या काळात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले असून, अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे.
मात्र, याची खेद, खंत संबंधित कंत्राटदाराला व एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनाही नाही. अधिकाऱ्यांनी केवळ दरवर्षी इमानेइतबारे कंत्राटदाराला टोलचे दर मात्र वाढवून दिले आहेत. आजही या रस्त्यावर अनेक कामे प्रलंबित असून, या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. परिणामी आपल्या जाहीर आश्वासनाला केराची टोपली दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही वेलणकर यांनी म्हटले आहे.