सांगवी : माळशिरस तालुक्यातील बोरगांव (माळवाडी) येथील स्मशानभूमीत प्रेताच्या अंत्यसंस्कारास विरोध करून प्रेताची विटंबना केल्याच्या धक्कादायक घटने नंतर संबंधीत व्यक्ती व पोलीस प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर त्वरीत निलंबनाची कारवाई व्हावी. अन्यथा आंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने बारामतीचे प्रांताधीकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शुक्रवारी दि.२० रोजी सोलापूर जिल्ह्यातील बोरगांव (माळवाडी) येथील दलित समाजाती माजी सरपंचाच्या भावाचे निधन झाल्या नंतर त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीमध्ये घेवून निघाले असता तेथील उच्च जातीतील गाव गुंडांनी तीव्र विरोध केला. तसेच या रस्त्यावरून जायचे नाही हा रस्ता आमच्या मालकीचा आहे. असे म्हणून रस्त्यामध्ये वाहने आडवी लावली. त्यावेळी बाचाबाची होवून सदर प्रेत खाली पडले. व प्रेताची हेडसाळ होवून विटबंना केली. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी अखेर ग्रामपंचायतीसमोरच प्रेताला अग्नी दिला. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे.
या घटने नंतर मातंग एकता आंदोलनाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. प्रेत स्मशानभूमीमध्ये दहन करण्यास विरोध दर्शवून प्रेताची विटंबना केल्याने संबंधीत व्यक्ती विरोधात व पोलीस प्रशासनातील दोषी अधिकारी व कर्मचारी यांना त्वरीत निलंब करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा मातंग एकता संघटनेच्या वतीने आमरण उपोषण जनभोक्ष तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची आपण गंभीर दखल घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.