---
शिरूर : शिरूर शहर व तालुक्यातील अनधिकृत प्रयोगशाळा व तंत्रज्ञ यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी शासनाकडे केली आहे. यासंदर्भात, उपविभागीय दंडाधिकारी पुणे व तहसीलदार शिरूर, तालुका वैद्यकीय अधिकारी शिरूर आदींना त्यांनी निवेदन पाठविले आहे.
सय्यद म्हणाले की, महाराष्ट्र परावैदक अधिनियमाखाली तयार केलेल्या व ठेवलेल्या राज्य नोंदवहीत ज्यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. त्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञास परिषद नोंदणी क्रमांक व प्रमाणपत्र देते अशा परावैदक व्यावसायिका खेरीज इतर कोणत्याही व्यक्तीस, परावैदक व्यावसायिक म्हणून स्वतंत्रपणे वा एम.डी. पॅथोलॉजी, कार्पोरेट लॅबमध्ये तंत्रज्ञ म्हणून व्यवसाय व काम करता येणार नाही. असे स्पष्ट असताना ही अनेक जण कोणतीही मेडिकल लॅबोरेटरिज पदवी, पदविका नसताना महाराष्ट्र परावैदक परिषदेकडे नोंदणी नसताना क़्लिनिकल लॅबोरेटरिज थाटून कार्पोरेट पॅथलॅबचे रक्त नमुने संकलन करणारे तंत्रज्ञ म्हणून घरोघरी जाऊन रक्ताचे नमुने घेतात व अवास्तव शुल्क आकारणी करून परिषद व कायदाचे उल्लंघन करत आहेत, तसेच रुग्णांच्या आरोग्याशी खेळत असल्याचेही सय्यद म्हणाले.
दरम्यान, यासंदर्भात अनेक तक्रारी येत असून याबाबत तातडीने अनधिकृत पॅथोलॉजी लॅबोरेटरीवर कारवाई करावी अशी मागणी सय्यद यांनी केली आहे.