पुणे : पुलावामा हल्ल्यातील शहीदांचा बदला भारताच्या वायुसेनेने घेतल्याच्या पार्श्वभूमिवर या विजय दिनाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने पुण्यातल्या आठही विधानसभा मतदार संघामध्ये दुचाकीवरुन रॅली काढली. या रॅलीत अनेक कार्यकर्त्यांनी हेल्मेट घातले नव्हते. पुण्यात पाेलीस एकीकडे हेल्मेट न घालणाऱ्यांवर कडक कारवाई करत असताना दुसरीकडे या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात न आल्याने यांच्यावर कारवाई करा अन्यथा दाेन महिन्यात सामान्य पुणेकरांकडून वसूल करण्यात आलेला विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याचा दंड परत करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे यांनी केली आहे.
14 फेब्रुवारी राेजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात काश्मीरमधील पुलवामामध्ये 40 हून अधिक सीआरपीएफचे जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या कारवाईच्या अनुषंगाने भाजपाने राज्यात विविध ठिकाणी दुचाकी रॅली काढली. पुण्यातही ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी हेल्मेट घातले नव्हते. पुण्यात पाेलिसांकडून कडक हेल्मेटसक्ती राबविण्यात येत असताना या रॅलीतील कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता संभाजी ब्रिगेडकडून भाजप रॅलीतील 'विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करून दंड वसूल करण्याची मागणी केली आहे. हा दंड वसूल न केल्यास दाेन महिन्यात सामान्य पुणेकरांकडून वसूल करण्यात आलेला विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याचा दंड परत करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांवर हेल्मेट सक्तीची कार्यवाही नाही झाली आणि चौकाचौकात पुणेकरांवर हेल्मेट सक्तीचा दंड वसूल केला तर हा 'घटनेचा व वाहतूक नियमन कायद्याचे उल्लंघन पोलीस करणार का ? असा सवालही ब्रिगेडकडून उपस्थित करण्यात आला आहे.