लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात पहाटेपासून दिवसभर कचरा गोळा करण्यासाठी खराब अवस्थेतील महापालिकेच्या गाड्या बिनदिक्कतपणे रस्त्यांवर फिरताना दिसून येतात. पण त्या गाड्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र वाहतूक सेनेने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या गाड्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे़
याबाबत वाहतूक सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष एकनाथ ढोले यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेऊन, महापालिकेच्या पंधरा वर्षांपूर्वीच्या गाड्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ढोले यांनी सांगितले की, शहरात एकीकडे प्रादेशिक परिवहन विभागाकडून तसेच वाहतूक पोलिसांकडून खासगी वाहनांना साईड मिरर नाही, पीयूसी नाही, ग्रीन टॅक्स नाही म्हणून सध्या लक्ष्य केले जात आहे़ परंतु, वीस-तीस वर्षांपूर्वींच्या खराब गाड्या की ज्यांना नंबरप्लेट, हेडलाईट, साईड मिरर, इंडिकेटर, वायपर आदी इत्यादी अत्यावश्यक सुविधा नाही अशा महापालिकेच्या गाड्या बिनधास्तपणे दिवसभर रस्त्यांवर फिरत आहेत़ या वाहनांमुळे शहरात अनेकदा अपघातही झाले आहेत़ एवढे होऊनही आरटीओकडून महापालिकेच्या गाड्यांना कशाकरिता अभय दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी, महापालिकेच्या खराब गाड्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे़
---
फोटो मेल केला आहे़