भोर : भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगरात दर उन्हाळ्यात वणवा पेटवल्याने हजारो एकर गवत, झाडेझुडपे त्याचबरोबर निष्पाप वन्यप्राणी जळून नष्ट होत आहेत. अज्ञानामुळे वणवा लावण्याचे प्रकार होत आहेत. वन विभागाकडून अशा लोकांवर कारवाई करण्याची गरज आहे. तरच, वणवा लावण्याचे प्रकार कमी होऊन जंगलांचे संरक्षण होईल, अशी मागणी भोर तालुक्यातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केली आहे.भोर तालुक्याचा पश्चिम भाग सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला आहे. या भागात गवताचे प्रमाण अधिक आहे. पावसाळ्यात हिरवेगार गवत वृक्षवेलींची घनदाट झाडी यांमुळे डोंगरदऱ्यात ससा, हरिण, तरस, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, काळवीट, मोर, वाघ, लांडोर असे लहान-मोठे प्राणी याशिवाय विविध प्रकारचे पक्षी यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. मात्र, दर वर्षी शेतकरी वणवा पेटवत असल्याने जंगलातील पशुपक्षी, औषधी वनस्पती व संपूर्ण जंगलच नष्ट होत आहे.वणवा लावण्याने त्या जागेवर गवत चांगले उगवते आणि उत्पन्नातही वाढ होते, या गैरसमजापोटी शेकडो एकर डोंगररांगेतील गवत रात्रीच्या वेळी वणवा लावल्याने जळून खाक होते.वन विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील गावोगावी वनसंरक्षण समित्यास्थापन केल्या आहेत. त्यात गावातील लोकांचा सहभाग आहे. मात्र, अनेक गावांतील समित्या प्रभावीपणे काम करीत नाहीत. त्यामुळे या गावातील नागरिकांत व समित्यांमध्ये वणवा लावण्याने होणाऱ्या नुकसानाबद्दल जनजागृती वन विभागकडून केली जाते. अनेक गावांत वन विभागाने गॅसचे वाटप केल्यामुळे ग्रामीण भागात जंगलतोड अत्यंत कमी झाली आहे.(वार्ताहर)
वणवा पेटवणाऱ्यांवर कारवाई करा
By admin | Published: January 24, 2017 1:30 AM