सांगवी : शिरवली येथील नीरा नदीच्या बंधाऱ्यात ज्यांच्याकडून रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आले आहे, त्यांची तपासणी करून प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे यांनी केली आहे. खासगी दूध प्रकल्प, कारखान्यातून ओढ्याद्वारे सोडण्यात आलेल्या रसायनमिश्रित पाण्यामुळे पाणी दूषित होऊन हजारो मासे मृत अवस्थेत पडून पाण्यात माशांचा मोठ्या प्रमाणात खच जमा झाला आहे. या ठिकाणी जनावरांना ही पिण्यासाठी पाणी वापरात येत असते.
मात्र, सध्या हे दूषित पाणी जनावरांच्या पिण्यात आल्यास जनावरे ही दगावण्याची शक्यता आहे. तर येथील शेतीला ही पाणी वापरण्यात येते. तर शिरवली येथील काही व्यावसायिक येथील मासे पकडून माशांची विक्री करून आपला उदरनिर्वाह करत असतात. मात्र या पाण्यामुळे मासे मृत झाल्याने त्यांच्या उदरनिवार्हाचादेखील प्रश्न उद्भवू लागला आहे. तर पाणी प्रदूषणामुळे येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचादेखील प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. या सर्व बाबी लक्षात घेत सरकारने याची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करून पुन्हा असे प्रकार घडून येणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत सांगवी डोर्लेवाडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे यांनी पाहणीदरम्यान व्यक्त केले.यावेळी शिरवली, सांगवी येथील ग्रामस्थांनीही पाहणी करण्यासाठी गर्दी केली होती.याबाबत आमचे अधिकारी पाहणी करणार आहेत. ज्या ठिकाणहून रसायनमिश्रित पाणी सोडून देण्यात आले आहे. याची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यापुढे असे प्रकार घडताक्षणी ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवावे.- नितीन शिंदे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ