लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सर्व नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ‘वोटर हेल्पलाईन’ ॲप डाऊनलोड करून भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
सद्य:स्थितीमध्ये भारत निवडणूक आयोगाचा मतदार याद्यांचा विशेष पुन:निरीक्षण कार्यक्रम ९ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राबविला जात असून, त्यानुसार प्रारूप मतदार यादी १ नोव्हेबर २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविणे, मतदार ओळखपत्राच्या तपशीलात बदल करणे, तसेच, कुटुंबातील मयत सदस्याचे नावे वगळायचे असल्यास किंवा स्थंलातरित नागरिकांना त्यांचे नाव वगळणे व इतर ठिकाणी नाव समाविष्ट करणे इ. सुकर होण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी ‘वोटर हेल्पलाईन’ ॲप विकसित करण्यात आलेले आहे.