पुणे : सध्याची तरुणाई साेशल मीडियावर खूप वेळ घालवते. वाचनापासून तरुणाई दुरावत चालली आहे, असे नेहमीच म्हंटले जाते. परंतु हाच समज पुण्याच्या तरुणाईने खाेटा ठरवला आहे. पुण्यातील काेथरुड भागात काही तरुण एकत्र येत त्यांनी ओपन ग्रंथालय सुरु केले आहे. ज्याठिकाणी माेफत पुस्तके वाचायला मिळणार असून नागरिक त्यांच्याकडील पुस्तके देखील ग्रंथालयाला देऊ शकणार आहेत.
पुण्यातील काेथरुड भागातील जीत मैदान या ठिकाणी हे ओपन ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील तरुण एकत्र येत त्यांनी हे ग्रंथालय सुरु केले आहे. जास्तीत जास्त लाेकांनी वाचावं आणि वाचन परंपरा चालू रहावी यासाठी हे ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी एक कपाट ठेवले असून त्यात विविध विषयांवरील पुस्तके आहेत. नागरिक 24 तास कधीही त्यांना हवं ते पुस्तक घेऊन जाऊ शकतात. तसेच वाचून पुन्हा या ठिकाणी ठेऊ शकतात. तेही माेफत. तसेच ज्यांच्याकडे विविध विषयांवरील पुस्तके आहेत ते नागरिक या ग्रंथालयाला पुस्तके भेट सुद्धा देऊ शकतात. 7 डिसेंबर राेजी सुरु करण्यात आलेल्या या ग्रंथालयामध्ये 200 पुस्तके ठेवण्यात आली हाेती. त्यातील 100 पुस्तके नागरिक वाचनासाठी घेऊन गेले आहेत. दाेनच दिवसात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या ठिकाणी तरुणांनी माेबाईल क्रमांक दिला आहे. नागरिकांनी त्यांनी घेतलेल्या पुस्तकाचे नाव त्या नंबरवर पाठवायचे आहे. तसेच पुस्तक वाचल्यानंतर अभिप्राय सुद्धा त्या क्रमांकावर नागरिकांना कळविता येणार आहे. या उपक्रमाबद्दल बाेलताना प्रियांका चाैधरी म्हणाली, सध्या जी लाेप पावत चाललेली वाचन संस्कृती आहे ती पुन्हा एकदा सुरु व्हावी यासाठी आम्ही हे ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. यातून तरुणांना नक्कीच नवीन विचार मिळेल असे वाटते. अभिषेक अवचर म्हणाला, हे ग्रंथालय 24 तास सुरु असल्याने पुस्तके चाेरी हाेतील अशी शंका उपस्थित केली जाते. परंतु मला वाटते जेव्हा पुस्तके चाेरीला जाण्यास सुरु हाेतील ताे आपल्या देशातील चांगला दिवस असेल. लाेकांनी येथून पुस्तके न्यावीत आणि वाचून झाल्यावर इतरांना वाचण्यासाठी द्यावीत. आमच्या या उपक्रमाला नागरिकांचा माेठा प्रतिसाद मिळत आहे.