पिपंरी : समाजमाध्यम हे दुधारी अस्त्र आहे. हे माध्यम वापरताना काळजी घ्या. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देताना डोक्यावर बर्फ ठेवा. सौजन्याने वागा. आपल्यातील तापटपणा काढून टाका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.५) दिला. काम करताना काही गडबड झाली तर, मी थेट टीका करेन, असेही त्यांनी या वेळी बजावले.
पिंपरी चिंचवड पोलिसांचा ‘एक्स ट्रॅकर’ उपक्रम आणि समाज माध्यमांवरील पेजेसचा लोकार्पण सोहळा चिंचवड येथे पवार यांच्या हस्ते पार पडला. या वेळी त्यांनी पोलिसांना समाज माध्यमांवर उत्तर देताना काळजी घेण्याचा सल्ला दिला. आमदार दिलीप मोहिते, अण्णा बनसोडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार उपस्थित होते.
समाजमाध्यम वापरताना ‘ध’चा ‘मा’ होऊ नये, यासाठी अधिक काळजी घ्यायला हवी. समाज माध्यमांवर लाखो लोक तुमच्याशी जोडलेले असतात. त्यांना अचूक माहिती दिली पाहिजे. त्यांच्या प्रश्नांना नीट उत्तरे द्यावीत. नागरिकांशी सौजन्याने वागावे. त्यासाठी तापटपणा काढून टाका, हे तुम्हाला अजित पवार सांगतोय, असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
पिंपरी-चिंचवड हद्दीत पोलीस ठाणे वाढविण्याची मागणी केली जात आहे. त्याचा पाठपुरावा केला जाईल. त्यासाठी महापालिका आवश्यक अर्थसाहाय्य करेल. स्मार्ट पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलिसांच्या चेहऱ्यावर टवटवी दिसते. पिंपरी-चिचंवडमधील अनेक ठाणी स्मार्ट झाली असली, तरी राज्यातील बऱ्याच ठाण्यांची अवस्था दयनीय आहे. ठाणी स्मार्ट करण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे अनुकरण करा, अशी सूचना करणार असल्याचे पवार म्हणाले.
---
काय आहे एक्स ट्रॅकर?
सराईत आणि तडीपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी एक्स ट्रॅकर हे ॲप्लिकेशन तयार केले आहे. तडीपार गुन्हेगारांना दररोजची माहिती या माध्यमातून पोलिसांना द्यावी लागेल. तडीपार गुन्हेगारांना ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडण्यात आले, तेथून दररोज आपला फोटो आणि ठिकाण याची माहिती पोलिसांना पाठविणे बंधनकारक असेल.
---
समाजमाध्यमातून नागरिकांशी संवाद
पोलीस आणि नागरिकांमधील संवाद वाढविण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सूचना, तक्रारी, विविध विषयांवरील मते या माध्यमातून पोलीस जाणून घेतील. त्यासाठी विविध समाजमाध्यमांवर पोलीस सक्रिय झाले आहेत.