शिरूर : शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील माजी सरपंच तसेच जि. प. शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासह इतरांवर दाखल केलेला खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी तालुक्यातील मराठा बांधवांनी सोमवारी शहरात मूक मोर्चा काढला. राज्यातील मोर्चात मराठा बांधवांनी ज्या पद्धतीने शिस्तीचे व एकजुटीचे दर्शन घडविले, त्याच पद्धतीने आजच्या मोर्चातील चित्र दिसून आले.शिरसगाव काटा गावचे माजी सरपंच रामचंद्र केदारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक संदीप आढाव, माजी सरपंच भरत चव्हाण, धनश्री चव्हाण यांच्यासह सात जणांविरुद्ध सात आॅक्टोबरला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात केदारी व त्यांच्या कुटुंबीयांनी पालकसभेत प्रतिविद्यार्थी एका पालकाला प्रवेश असताना सभेच्या ठिकाणी प्रवेश केला. याबाबत मुख्याध्यापक आढाव समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना केदारी यांनी आढाव यांना अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ केली. मुख्याध्यापक अपंग तसेच राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक असल्याने त्यांचा अपमान करू नका, शिवीगाळ करू नका, असे सांगणाऱ्या चव्हाण यांच्या अंगावर केदारी धावून गेले व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. प्रकरण मिटवण्यासाठी पैशाची मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने केदारी यांनी खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असे निवेदनात म्हटले आहे.मोर्चा तहसील कार्यालय येथे आल्यावर तेथे सभेत रूपांतर झाले. राज्यातील मोर्चाप्रमाणेच छोट्या व्यासपीठावर केवळ पाच मुलींनाच बोलण्याची संधी देण्यात आली. ऐश्वर्या रणदिवे, आदिती आढाव, ऋतुजा खोले, खोडदे, प्रेरणा बारवकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले. तालुक्यातील विविध भागांतून मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात शिक्षकवर्गही होता. इतर समाजाचे बांधवही मोर्चात सहभागी झाले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अॅड. अशोक पवार यांच्यासह विविध पक्षांचे, संस्था, संघटनांचे पदाधिकारी आवर्जून मोर्चात सहभागी झाले. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, दौंड उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे, शिरूरचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मराठा समाजाच्या वतीने युवतींच्या हस्ते तहसीलदार राजेंद्र पोळ यांना निवेदन सुपूर्त करण्यात आले व मोर्चाची शांततेत सांगता करण्यात आली. (वार्ताहर)
अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा मागे घ्या
By admin | Published: October 11, 2016 1:45 AM