पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचेविद्यार्थी आणि विद्यापीठाचे सुरक्षारक्षक यांच्यामध्ये रिफेक्टरीच्या आंदाेलनावरुन झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमिवर विद्यापीठाकडून 12 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल करुन विद्यापीठ विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असून या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा अन्नत्याग सत्याग्रह करण्यात येईल असा इशारा आंदाेलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. आज पत्रकार परिषद घेत विद्यार्थ्यांनी ही माहिती दिली.
विद्यापीठाने रिफेक्टरीबाबत जाहीर केलेल्या नवीन नियमावलीमुळे विद्यार्थी आणि विद्यापीठामध्ये वाद निर्माण झाला हाेता. रिफेक्टरीमध्ये मासिक पास असणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येईल, एका थाळीत दाेन विद्यार्थ्यांनी जेवण करु नये, रिफेक्टरीमधील टिव्ही काढून टाकण्यात यावा असे अनेक नियम विद्यापीठाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले हाेते. या नियमांवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला हाेता. 1 एप्रिल राेजी विद्यार्थी आणि विद्यापीठाचे सुरक्षारक्षक यांच्यात झालेल्या झटापटीत रिफेक्टरीची एक काच फुटली हाेती. विद्यापीठाकडून 12 आंदाेलक विद्यार्थ्यांवर सरकारी कामात अडथळा याबराेबरच इतर गुन्हे दाखल केले हाेते. जेवण मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर दडपशाही करुन विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचे काम विद्यापीठ प्रशासन करत आहे. गुन्हे दाखल करुन विद्यार्थ्यांच्या भविष्याची विटंबना करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील दाखल सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी आता विद्यार्थ्यांनी केली आहे.