लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मागच्या पावसाळा चांगला झाल्याने यंदा खरिपाचा हंगाम चांगला जाईल. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांना काहीही कमी पडता कामा नये, पीककर्जापासून खते बियाणांपर्यंत सर्व प्रकारची काळजी घ्यावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी विभागाला केली.
कौन्सिल हॉलमध्ये पवार यांनी शुक्रवारी सकाळी खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठक घेतली. जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद तसेच जिल्हा बँक, महाबीज व शेतीशी संबंधित विविध खात्यांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
कोरोना प्रोटोकॉलमुळे बैठकीला लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते. मात्र त्यांनी केलेल्या सूचनांची पवार यांनी दखल घेत त्यावर त्वरित योग्य कार्यवाही करण्यास सांगितले. खासदार अमोल कोल्हे, गृहमंत्री दिलीप वळसे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच आमदार संग्राम थोपटे, भीमराव तापकीर, संजय जगताप, अशोक पवार, राहुल कुल, अतुल बेनके व अन्य लोकप्रतिनिधींंनी शेततळी, बांधबंदिस्ती, खते, बियाणे पुरवठा असे विविध प्रश्न विचारले होते. पवार यांनी ते ऐकून घेतले.
जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांंनी नंतर खरीप हंगामाची जिल्ह्यातील पीकनिहाय, क्षेत्रनिहाय माहिती दिली. पीकविमा, पीककर्ज, सरकारच्या कृषीविषयक योजना यांची पवार यांनी तालुकानिहाय माहिती घेतली. जिल्हा बँक अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, हयगय करू नये, बियाणे खते यांचा साठा वारंवार तपासून घ्यावा, काळा बाजार कोणी करत असेल तर कडक कारवाई करावी, असे आदेश पवार यांनी दिले. खरीप हंगामात सरकारी मदत, मार्गदर्शन याबाबत एकाही शेतकऱ्याकडून तक्रार यायला नको, असे पवार यांनी सर्वांना बजावले.
खरिपाचे जिल्ह्याचे एकूण क्षेत्र- ३ लाख हेक्टर, फक्त उसाचे क्षेत्र- १ लाख ३६ हजार हेक्टर आहे.